महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर
स्थापना :
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना शासन निर्णय क्रमांक. सीडीएस-10/2001(पीके-59) एडीएफ-4 मुंबई-32 दि. 02.04.2002 अन्वये करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय पुणे येथे स्थापन करण्यात आले व त्यानंतर शासन निर्णय क्रमांक सीडीएम-10/2001 (पीके-59) पदुम-4 मंत्रालय, मुंबई-32 दिनांक 07.06.2003 अन्वये मंडळाचे मुख्यालय अकोला येथे दिनांक 12.09.2003 रोजी स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2020/प्र.क्र.145/पदुम-4 मंत्रालय, मुंबई-32 दिनांक 05.02.2021 अन्वये मंडळाचे मुख्यालय, नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले.
मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश :
केंद्र शासनाने राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प संपुर्ण राज्यामध्ये राबवून पशुपैदासीची विशेष तज्ञतेची सेवा अधिक कार्यक्षमतेने पुरवून विशेषत: राज्याच्या मागासलेल्या भागात संकरीत पशुपैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामिण रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील देवणी, खिल्लार, गवळाऊ, लालकंधारी, डांगी या मान्यताप्राप्त देशी गोवंशीय जातीच्या तसेच पंढरपुरी व नागपूरी या म्हैसवर्गीय जनावरांचे त्यांच्या मायभुमीत जतन व संवर्धन करणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.
मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश :
कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून संकरीत व सुधारीत देशी गोपैदास, तसेच सुधारीत महिष पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करतांना गोठीत रेतमात्रांचा दर्जा व गुणवत्ते बरोबरच, कृत्रिम रेतनाव्दारे, संकरीत गोपैदास, सुधारीत देशी व सुधारीत महिष पैदास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्यातील बेरोजगार पशुवैद्यकांची सेवा उपयोगात आणुन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे हा सुध्दा महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :
- राज्यात पशुपैदासीच्या सुनिश्चित केलेल्या धोरणानुसार कृत्रिम रेतनाव्दारे संकरीत/सुधारीत पशुपैदासीकरिता कार्यक्रम राबविणे तसेच राज्यातील कृत्रिम रेतनाचे जिल्हानिहाय लक्ष्य ठरविणे व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा व सनियंत्रण करणे.
- राज्यात उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतनाच्या सेवा आणि गोठीत रेतमात्रांचा दर्जा उत्तम व विहीत मानकानुसार राहील यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे.
- राज्यात क्षेत्रीय पैदास चाचणी कार्यक्रम राबवून सिध्द वळूंची निश्चिती करणे.
- राज्यामध्ये केंद्र/राज्य पुरस्कृत योजना राबविणे मुख्यत्वे राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प, राष्ट्रीय गोकुळ मिशन, राष्ट्रिय पशुउत्पादकता अभियान, पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा कार्यक्रम, राष्ट्रिय पशुविमा योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम.
- केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करतांना शासनाच्या कृषि, ग्रामविकास, जलसंधारण, राष्ट्रीय पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम आणि स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजना यांचा योग्य समन्वय ठेवणे.
- राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प, या योजनेची अंमलबजावणी करतांना दुग्धव्यवसाय विभाग, स्वयंसेवी संस्था, सहकारी दुध संघ, पशुपैदासकाराच्या संघटना आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचेशी समन्वय ठेवून त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणे.
- महाराष्ट्र पशुधन विकास मंडळा अंतर्गत क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थांवर प्रशासकिय, तांत्रिक व वित्तीय नियंत्रण ठेवणे.
- राज्यातील शेतकरी/पशुपालकांच्या गाई/म्हशींना शासकिय कृत्रिम रेतन केंद्रांमार्फत/सेवादात्यांमार्फत कृत्रिम रेतनाच्या सुविधा पुरविणे.
महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 02.04.2002 अन्वये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या संचालक मंडळाची रचना गठीत करण्यास मंजूरी प्रदान केलेली आहे व त्यानुसार संचालक मंडळ खालील प्रमाणे कार्यरत आहे.
अ.क्र | पदनाम | सदस्य |
---|---|---|
1 | प्रधान सचिव/सचिव (पदुम) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई. | अध्यक्ष |
2 | आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे. | सदस्य |
3 | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ, गोरेगांव, मुंबई. | सदस्य |
4 | संचालक संशोधन, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. | सदस्य |
5 | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला | सदस्य |
6 | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा. | सदस्य |
7 | प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक. | सदस्य |
8 | प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, सातारा | सदस्य (अशासकिय) |
9 | वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय कृषि औद्योगिक प्रतिष्ठाण, ऊरळीकांचन पुणे (तज्ञ) | सदस्य |
10 | सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, कृषि मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली | सदस्य |
11 | मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला. | सदस्य सचिव |
अ.क्र | संस्था | संख्या |
---|---|---|
1 | गोठीत रेत प्रयोगशाळा | पुणे, औरंगाबाद, नागपूर (एकुण-3) |
2 | वळू संगोपन केंद्र | औरंगाबाद, नागपूर (एकुण-2) |
3 | वळू माता प्रक्षेत्र | जत, जुनोनी, ताथवडे, हिंगोली, कोपरगांव, पोहरा, वडसा (एकुण-7) |