बंद

    विभागाविषयी

    तारीख प्रकाशित करा : November 21, 2023

    शेतीसाठी निविष्ठा, व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा व कौटुंबिक एकनिष्ठता निर्माण करून ग्रामीण अर्थचक्राला गतिमान करणारा व्यवसाय म्हणजे पशुसंवर्धनाचा व्यवसाय होय. महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्यात इथल्या पशुधनाचा वाटा मोठा राहिला आहे. या पशुधनाच्या संगोपन, संवर्धन आणि विकासाची जबाबदारी सांभाळत प्रगत व उन्नत महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देण्यात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागही नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पशुसंवर्धन विभागाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीतही ग्रामीण भागातील प्रत्येक समाजघटकाला सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे काम सातत्यपूर्वक केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांमुळे आज ग्रामीण भागात विकास आणि प्रगतीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. धवलक्रांतीच्या माध्यमातून विविध योजना, संशोधन व पशुसंवर्धनविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीतून ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र आणखी गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून कार्यरत व कटीबद्ध राहिला आहे.

    पशुजन्य उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेत राज्यास अव्वल क्रमांकित करणे, पशुसंवर्धनविषयक जास्तीत जास्त उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, संख्यात्मक पशुधनापेक्षा गुणात्मक पशुधनाच्या वृद्धीस चालना देणे व कालसुसंगत अभिनव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक पशुपालनाची व्यापकता राज्यभर वाढविण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग कटीबद्ध राहील. या प्रवासात राज्यातील पशुपालक-शेतकरी बांधवांची साथ निश्चितच मोलाची ठरेल!